पिंपरी : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ नष्ट केले. शहरातील १५६ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा साठा रांजणगाव एमआयडीसी येथील अधिकृत औद्योगिक भट्टीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईत ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर, १२ किलो अफूची झाडे आणि १०९ किलो डोडा यांचा समावेश होता. न्यायालयीन प्रक्रिया आणि शासनाच्या नियमांची पूर्तता केल्यानंतर या अमली पदार्थांची अंतिम विल्हेवाट लावण्यात आली. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, उपआयुक्त संदीप आटोळे यांच्या उपस्थितीत रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या भट्टीत अमली पदार्थ जाळण्यात आले.
यावेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.
काळेवाडीत घरफोडी प्रकरणी एकास अटक
काळेवाडी येथील एम एम चौक परिसरातील मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने गल्ला आणि कपाटातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना ३० जून रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली.
शंकर सोपान सगर (१८, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. व्यावसायिक अधिकराव विश्वासराव भोसले (५३, ज्योतीबा नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट व गल्ल्यातील एकूण ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
ट्रॅव्हल्स बस मधील बॅटरी, स्टेपनी चोरणाऱ्या दोघांना अटक
ट्रॅव्हल्स बसमधून ४५ हजार रुपये किमतीची बॅटरी आणि स्टेपनी चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (१ जुलै) सायंकाळी भोसरीत घडली.
लखन गौतम चौधरी (३०, पारोळा, जळगाव) आणि विजय प्रकाश कोळी (४३, आसोदा, जळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ट्रॅव्हल्स चालक दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे (४८, धावडे वस्ती, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ट्रॅव्हल्स पार्क केली असता आरोपी यांनी संगनमताने लबाडीच्या इराद्याने बसमधील मुद्देमाल चोरला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
