पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नगरपरिषदेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाया सुरू केल्या आहेत. एमआयडीसी भोसरी, चाकण आणि काळेवाडी परिसरातील तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली.
याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात केली असून निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेला प्रीतम उर्फ शुभम राहुल राठोड (२३, कुदळेवस्ती, मोशी) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी, अवैधरित्या मद्य विक्री करण्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे.
चाकण परिसरातील अट्टल गुन्हेगार महेश बबन कड (३२, कडाचीवाडी, चाकण) याच्या विरोधात खून, खंडणी मागणे, मारामारी असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सौरभ विकास साठे (२२, रहाटणी) याच्यावर देखील खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे, पिस्तूल आणि इतर हत्यारे जवळ बाळगणे असे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो अमरावती मध्यवर्ती कारागृहात आहे.
स्थानिक पोलिसांनी तीनही आरोपींच्या विरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तीनही आरोपींना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २५ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
सराईत गुन्हेगारांवर अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरु आहेत. या कारवायामुळे भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांची संख्या चोवीसवर
पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यन्वित झाले. त्यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. त्यानंतर रावेत, शिरगाव परंदवडी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. चाकण दक्षिण आणि उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यांना नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांची संख्या चोवीसवर गेली आहे. वाढत्या हद्दीबाहेर गुन्हेगारीतही वाढ होताना दिसून येत आहे.
