पिंपरी : भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. महत्त्वाच्या, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा परिसर लष्करी दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जातो. दापोडी येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई), दिघी येथे संशोधन व विकास संस्था (आर अँड डीई), देहूरोड येथे आयुध निर्माण (ॲम्युनिशन) डेपो आहे. तर, तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) कार्यालय आहे. त्यामुळे हा परिसर लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. सध्या देशभरात युद्धजन्य वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांशी संवाद साधला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीची ठिकाणे असणारे मॉल, व्यापारी संकुल, बाजार पेठ, उद्याने, पर्यटन स्थळे, रेल्वे बस स्थानक या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देत आहेत. पोलिसांची विविध पथके तयार करून त्याद्वारे गोपनीय माहिती संकलित केली जात आहे. चुकीच्या अथवा समाज माध्यमावर अफवा पसरविणाऱ्या संदेशांवर पोलिसांचा सायबर सेल बारकाईने नजर ठेवून आहे.

पोलीस आयुक्तालय हद्दीतील महत्त्वाची ठिकाणे तसेच, संवेदनशील आस्थापना या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. – संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड