पिंपरी : फुगेवाडीतील विषारी दारु प्रकरणात १७ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षकांपासून अपर पोलीस आयुक्तांना अवैध धंदे बंद असल्याला अहवाल दर महिन्याला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अवैध धंद्याकडे दुर्लक्ष, चालकांना पाठिशी घातल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
फुगेवाडीतील विषारी दारूकांड प्रकरणात १७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अवैध दारूविक्रीसह विविध अवैध धंद्यांविरोधात वेळोवेळी कठोर कारवाईच्या सूचना देऊनही स्थानिक स्तरावरील दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाईच्या सूचना देऊनही अवैध धंदे चालू आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चौबे यांनी अवैध धंद्यांबाबत थेट जबाबदारी निश्चित करणारा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
दर महिन्याला प्रमाणपत्र द्यावे लागणार
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याचे उच्चाटन करणे आणि हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद असल्याबाबतचे लेखी प्रमाणपत्र दर महिन्याच्या एक तारखेला सहायक पोलीस आयुक्तांना सादर करावे लागणार आहे. सहायक आयुक्तांना सर्व अवैध धंदे बंद असल्याची खात्री करुन लेखी प्रमाणपत्र पोलीस उपायुक्तांना तीन तारखेपर्यंत द्यावे लागणार आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळातील सर्व ठाण्याच्या हद्दीतील धंदे बंद असल्याची खात्री करुन अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) यांना पाच तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करतील. अपर पोलीस आयुक्त दर महिन्याच्या दहा तारखेला अवैध धंदे बंद असल्याचा अहवाल सादर करतील.
शिस्तभंगाची कारवाई
पोलीस ठाणे, विभाग, परिमंडळ आणि प्रादेशिक स्तरावर उत्तरदायित्वाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अवैध धंदेचालकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, कारवाईत कुचराई केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
अवैध धंदे बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अवैध धंद्यांबाबत कोणतीही कुचराई किंवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
