पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. यातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगेला त्याच दिवशी वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॉम्प्लेक्सच्या समोर रिक्षा उभी करत असल्याने तो हे कृत्य केल्याच समोर आलं होतं. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

वाकड परिसरातील म्हातोबा नगर येथे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक रिक्षा उभी करत असत. तसेच, ते तिथे लघुशंका करायचे असं आरोपी सुरक्षा रक्षक घाडगे याचं म्हणणं असून त्यांना वारंवार सांगून ही ते तिथे रिक्षा पार्क करायचे. याचाच राग मनात धरून तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री इतर मित्रांच्या मदतीने पार्क केलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.