पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख झाला की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण येते. हे शहर त्यांचे लाडके होते’, असे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे झालेल्या जागेच्या सातबारा उताऱ्याचे हस्तांतरण, कृत्रिम प्रज्ञा आधारित सीसीटीव्ही व आयटीएमएस प्रकल्पाचा शुभारंभ, पिंपरी पोलीस संकुलाचे भूमीपूजन, आधुनिक वाहने, साधनसामुग्रीचे लोकार्पण, नशामुक्त अभियानाचा शुभारंभ मंगळवारी झाला.

त्यावेळी त्या बोलत होत्या. आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, बाबाजी काळे, सुनील शेळके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘शहराचे औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा, विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शहर आणि अजित पवार हे अतूट समीकरण निर्माण झाले होते. आयुक्तालयाच्या सक्षमीकरणासाठी अजित पवार यांनी पाठपुरावा केला. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेतले. शहराचा विस्तार होत असून वाहतुकीचा ताणही वाढत आहे. गुन्हेगारीचे स्वरुपही बदल आहे. त्यासाठी पोलिसांनी आधुनिक होणे आवश्यक आहे.’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विस्तार

‘पिंपरी-चिंचवड शहराने काही वर्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पायाभूत सुविधा सक्षम झाल्या आहेत. हे शहर झपाट्याने बदलत असून लोकसंख्या वाढत आहे. शहराच्या कायापालट होण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. खासदार झाल्यापासून त्यांनी शहराच्या विकासात लक्ष घातले. २५ वर्षे त्यांनी शहराचे नेतृत्व केले. अजित पवार यांच्या दूरदृष्टीने शहराचा नियोजनबद्ध विकास झाला आहे. एकेकाळी पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी पुण्यात राहतो असे सांगत होते. आता पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असल्याचे अभिमानाने सांगतात, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अत्याधुनिक यंत्रणा दिल्यानंतर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे

कायदा सुव्यस्था सांभाळणाऱ्या व्यक्तीला मानवी चेहरा असावा लागतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पोलिसांनी एक दिवसांचे वेतन दिले.  राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी हात आखाडता घेतला जाणार नाही. मुख्यालयाचे काम दर्जेदार झाले पाहिजे. पोलिसांकडे गुन्हेगारांपेक्षा चांगली वाहने असली पाहिजेत. अत्याधुनिक यंत्रणा दिल्यानंतर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी. अमली पदार्थाविरोधात कडक कारवाई करावी. तरुणाई भविष्यात अंधारात ढकलणाऱ्या अमली पदार्थाचे जाळे मुळासकट उखडून काढावे. पूर्वी लोक पोलीस ठाण्यात जायला घाबरत होते. आता परिस्थिती बदलली आहे. पोलिसांची प्रतिमा बदलत आहे. सर्वसामान्यांना पोलीस आधार वाटत आहेत. पोलिसांना हवी ती मदत शासनाकडून केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.