पिंपरी : अमली पदार्थ (एमडी ड्रग्जसह) तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ही कारवाई चिखलीतील झेंडा चौकातील इमारतीसमोर रविवारी करण्यात आली. यश उर्फ रघु अतुल कदम (वय २५, रा. मिलिंदनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार चेतन सावंत यांनी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे एक लाख पाच हजार ५५० रुपयांचे १० ग्रॅम ५५ मिलीग्रॅम अमली पदार्थ मिळून आले. आरोपीने हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले होते. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. फौजदार देवकुळे तपास करत आहेत.
कंपनीसमोर मद्य पिण्यास मनाई केल्याने मारहाण
खासगी कंपनीतील ओट्यावर मद्य पिण्यास मनाई केल्याचा राग आल्याने दोन जणांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना दिघीतील परांडेनगर, येथे एका कंपनीसमोर घडली. याबाबत २२ वर्षीय तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कंपनीतील कामगार हा ओट्यावर मद्यप्राशन करीत होता. त्याला फिर्यादीने रोखल्याने आरोपी चिडले. लोखंडी कड्याने फिर्यादीच्या नाकावर व डाव्या डोळ्यावर मारहाण केली. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर प्लास्टिक कॅरेट डोक्यावर आपटून जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक भिसे तपास करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. कुशेश्वर गेनौर प्रसाद (वय ५३, रा. काटेवस्ती रोड, पुनावळे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सोनी कुशेश्वर प्रसाद (वय २९, रा. काटेवस्ती रोड, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील कुशेश्वर प्रसाद हे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. ते ताथवडे येथील एका हॉटेलजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने कुशेश्वर यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी तपास करत आहेत.
