पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनसंख्या, औद्योगिक क्षेत्रांमधील वर्दळ आणि महामार्गांवरील वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एका महिन्यात ७४ हजार ६५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून सहा कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे आणि चिखलीसारखी मोठी औद्योगिक क्षेत्रे आहेत. तसेच, हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे असून, देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. आयुक्तालय हद्दीतून पाच महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. राज्यातील, तसेच देशातील नागरिक हे रोजगारानिमित्त पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात स्थायिक झाल्याने शहराचा वेगाने विस्तार आणि वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमितपणे कारवाई केली जाते.
पोलिसांनी १ ते ३१ मे २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत नंबर प्लेटमध्ये बदल, सिग्नल तोडणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, नो पार्किंगसह विविध नियमभंगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. कारवाईमध्ये सर्वाधिक नो पार्किंगची १९ हजार ३४० जणांवर कारवाई करण्यात आली. ११ हजार ५८० टोईंग कारवाई करण्यात आल्या. ट्रिपल सीटची ६ हजार ५३९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
मे महिन्यातील कारवाई
- वाहतुकीस अडथळा/नो पार्किंग – १९,३४०
- टोईंग कारवाई – ११,५८०
- सिग्नल तोडणे – ८,४८३
- जड-अवजड वाहन कारवाई – ८,१४२
- ट्रिपल सीट – ६,५३९
- नंबर प्लेट बदल – ५,४७५
- बसवरील कारवाई – ३,४९०
- रिक्षा कारवाई – ३,१०२
- काळी काच – ३,०९०
- मोबाइलवर बोलणे – १,९९३
- सायलेन्सर बदल – १,०३२
- विनापरवाना – ८७०
- हेल्मेट कारवाई – ४२९
- ड्रंक अँड ड्राइव्ह – ४०२
- धोकादायकरीत्या वाहन चालविणे – २८४
- विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – २३९
- वाहन परवाना निलंबन – १६६
- एकूण कारवाई : ७४,६५६
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. दंडात्मक, तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम देशमुख यांनी केले आहे.
