पिंपरी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक भारतीयाला आठ हजार रुपयांची दिवाळी भेट असा संदेश आला तर जरा थांबा… हा कोणताही सरकारी बोनस नसून सायबर चोरट्यांनी तुमच्या बँक खात्यावर टाकलेला ‘दरोडा’ असेल. या आमिषाला भुलून लिंकवर क्लिक केले तर तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे होईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.
सध्या व्हॉट्सॲपवर एका बनावट संदेशचा महापूर आला आहे. पंतप्रधानांचे नाव आणि फोटो वापरून ‘सरकारी रोख अनुदान मंजूर’ झाल्याचा बनाव केला जातोय. संदेशामधील लिंक उघडताच हुबेहूब सरकारी वाटणाऱ्या एका बनावट पेजवर नेले जाते. तिथे तुमचं नाव, बँक खात्याचा तपशील, पॅन कार्ड आणि आधार क्रमांक भरून घेतला जातो. पुढच्याच क्षणी ओटीपी किंवा यूपीआय पिन विचारून खात्यातील सर्व रक्कम क्षणात लंपास केली जाते. सरकारी योजना म्हटली की सर्वसामान्य नागरिक पटकन विश्वास ठेवतात. लोकांचा हाच भोळेपणा सायबर चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. खूश होऊन अनेकजण हा संदेश आपल्या नातेवाईक आणि मित्रांनाही फॉरवर्ड करत आहेत; ज्यामुळे नकळत इतरही या जाळ्यात ओढले जात आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी करा!
कोणत्याही अनोळखी लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.
बँक तपशील, पासवर्ड, यूपीआय पिन किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.
सरकारी योजनांची खातरजमा केवळ अधिकृत संकेतस्थळांवरून (gov.in किंवा nic.in) करा.
खात्री नसलेले मेसेज ग्रुपवर किंवा मित्रांना फॉरवर्ड करणे टाळा.
फसवणूक झाल्यास तातडीने डायल करा ‘१९३०’
तसेच http://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा
पंतप्रधानांच्या नावे आलेला बोनसचा संदेश बनावट आहे. त्या संदेशामधील लिंकवर क्लीक करू नका. तसेच आपल्या बँकेची माहिती किंवा आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले.
