पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत असलेले औद्योगिक आणि आयटी क्षेत्र, बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील झोनची (परिमंडळ) फेररचना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता यावी, पोलीस यंत्रणेवरचा ताण समतोल राहावा, या उद्देशाने ही नवी रचना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात यापूर्वी तीन परिमंडळ कार्यालये होती. मात्र, प्रशासकीय सोयीसह भौगोलिक विचार करून आता तीनऐवजी चार परिमंडळांची रचना करण्यात आली आहे. या चारही परिमंडळांचे प्रमुख पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणार असून, सर्व परिमंडळांवर अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली यांचे नियंत्रण राहणार आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड यांच्याकडे गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार परिमंडळ एकमध्ये पिंपरी आणि सांगवी अशी दोन सहायक पोलीस आयुक्त कार्यालये असणार आहेत. सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी यांच्या अखत्यारीत निगडी, पिंपरी आणि चिंचवड ही पोलीस ठाणे आहेत. सहायक पोलीस आयुक्त सांगवी यांच्या अखत्यारीत संत तुकारामनगर, दापोडी आणि सांगवी पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आयटी पार्क हिंजवडीतील सुरक्षेसाठी सूक्ष्म नियोजन

परिमंडळ दोनमध्ये हिंजवडी आणि वाकड ही दोन सहायक पोलीस आयुक्त कार्यालये असणार आहेत. सहायक पोलीस आयुक्त, हिंजवडी यांच्या अखत्यारीत हिंजवडी आणि बावधन ही दोन पोलीस ठाणे राहतील. सहायक पोलीस आयुक्त, वाकड यांच्या अखत्यारीत वाकड, काळेवाडी आणि रावेत पोलीस ठाणे असणार आहेत. आयटी पार्क हिंजवडी, नव्या वसाहती आणि दळणवळणाच्या मुख्य मार्गांमुळे संवेदनशील ठरणाऱ्या या भागासाठी स्वतंत्र व सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

औद्योगिक पट्ट्यावर लक्ष

औद्योगिक पट्ट्याचा सहभाग असलेल्या परिमंडळ तीनमध्ये चाकण आणि भोसरी अशी दोन सहायक पोलीस आयुक्त कार्यालये असणार आहेत. सहायक पोलीस आयुक्त चाकण यांच्या अखत्यारीत चाकण उत्तर, चाकण दक्षिण आणि आळंदी ही पोलीस ठाणे आहेत, तर सहायक पोलीस आयुक्त, भोसरी यांच्या अखत्यारीत भोसरी एमआयडीसी, दिघी आणि भोसरी ही पोलीस ठाणे राहतील. शहराच्या उत्तरेकडील आणि वेगाने विस्तारत असलेल्या भागासाठी परिमंडळ चारची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. या परिमंडळात देहूरोड आणि म्हाळुंगे अशी दोन सहायक पोलीस आयुक्त कार्यालये असतील. सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड यांच्या अखत्यारीत चिखली, देहूरोड आणि शिरगाव पोलीस ठाणे येते. सहायक पोलीस आयुक्त, म्हाळुंगे यांच्या अखत्यारीत तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, उत्तर म्हाळुंगे आणि दक्षिण म्हाळुंगे ही चार पोलीस ठाणे असणार आहेत.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

गुन्हे तपास आणि विशेष विभागाच्या स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार असून, त्यांच्या अखत्यारीत युनिट एक ते चार, दरोडाविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, अमली पदार्थविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, पोलीस तक्रार मंडळ (पीसीबी), गुन्हे करण्याची पद्धत विभाग (एमओबी), सायबर पोलीस ठाणे कार्यरत राहणार आहे. पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्याकडे विशेष शाखा एक व दोनचा पदभार देण्यात आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडे, तर प्रशासनाची जबाबदारी पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.