पिंपरी : संभाजीनगर चिंचवड येथील प्रभाग क्रमांक ११ मध्ये उद्यानात सुरु असलेल्या सभामंडपाच्या कामावरून राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम आणि भाजप नगरसेवक निलेश नेवाळे यांच्यात भाजप आमदार महेश लांडगे यांच्या समोर राडा झाला.
आमदार महेश लांडगे रविवारी (१७ मे) सकाळी संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना त्यांच्या समोर हा प्रकार झाला. विशेष म्हणजे ज्या कामासाठी आमदार महेश लांडगे यांनी पत्र दिले आहे, त्याच कामासाठी भाजपच्या नगरसेविका विरोध करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांना पाडण्यासाठी १५ वर्षे मी तुमचे काम करत असल्याचे माजी महापौर कदम यांनी आमदार लांडगे यांना सांगितले.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये जॉगर्स पार्क येथे सभामंडपाचे काम सुरु आहे. हे काम स्थानिक नागरिक आणि माजी महापौर मंगला कदम यांच्या निधीतून केले जात आहे. या पार्क मध्ये दररोज शेकडो नागरिक जॉगिंग आणि व्यायामासाठी येत असतात. या उद्यानाला ऑक्सिजन पार्क म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये नैसर्गिक मातीचा ट्रॅक असल्याने नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी पसंती देतात. तिथे सुरु असलेल्या सभामंडपाच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप मध्ये वाद निर्माण झाला आहे. सभामंडपाचे काम बेकायदेशीर असल्याचे भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे, तर या कामासाठी स्वतः आमदारांनी पत्र दिले असून नागरिकांच्या मागणीनुसार हे काम सुरु असल्याचे राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचे म्हणणे आहे.
भाजप नगरसेवक निलेश नेवाळे म्हणाले, जॉगर्स पार्क मध्ये अनधिकृत बांधकाम सुरु आहे. तिथे ऑक्सिजन पार्क असल्याने ज्या गोष्टीसाठी आरक्षण आहे, त्याच गोष्टी तिथे बांधल्या पाहिजेत. दररोज या ठिकाणी सुमारे १५०० लोक व्यायामासाठी येतात. त्यांना गैरसोय व्हायला नको. आमदार महेश लांडगे हे रविवारी संभाजीनगर येथे कार्यक्रमासाठी आले असता राष्ट्रवादीच्या लोकांनी तिथे गोंधळ घातला.
माजी महापौर मंगला कदम यांची बाजू त्यांचे पुत्र गौरव कदम यांनी मांडली. आमदार महेश लांडगे यांनी जॉगर्स पार्क मध्ये आमदार निधीतून सभामंडप करण्यासाठी पत्र दिले होते. भाजपच्या आमदारांना भाजपचेच नगरसेवक विरोध करत आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांनी हे काम व्हावे, त्यात कोणताही अडथळा नको अशी मागणी केली. त्याबाबत आम्ही आमदारांकडे विचारणा केली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘महेशदादा आम्ही १५ वर्षे तुमचे प्रामाणिक काम केले आहे. या भागातील विदर्भातील लोक तुम्हाला मतदान करतात. तुम्हाला विचारून, पत्र घेऊन मी हे काम केले. संबंधित महिला तुमचे नाव सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांना पाडण्यासाठी १५ वर्षे मी तुमचे काम करते’.
