पिंपरी : यंदा जुलैपासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली असतानाच जून आणि जुलै या दाेन महिन्यांत शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर एक हजार ७८१ खड्डे पडले आहेत. त्यांपैकी एक हजार १५३ खड्डे पूर्णतः बुजविले असून, शहरात केवळ ६२८ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे लहान-माेठे अपघात हाेत असून, वाहतूक मंदावली आहे. खड्डे चुकवून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत आहेत. दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथांवरही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहे. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतुकीला संथगती आली असून, कोंडीत भर पडत आहे.

सर्वत्र खड्डेच खड्डे

शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. जूनपासून शहरातील विविध भागातील रस्त्यांवर एक हजार ७८१ खड्डे आढळले आहेत. त्यापैंकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने ४२६, बीबीएमने १५८, खडीने ४६१, पेव्हिंग ब्लॉकने १३, सिमेंट काँक्रिटने ९५ असे एक हजार १५३ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ६४.७४ टक्के आहे. शहरातील केवळ ६२८ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येतात.

खड्ड्यात पडून शालेय मुलगा जखमी

अजमेरा कॉलनीतील रसरंग चौकात सायकलसह खड्ड्यात पडून शालेय मुलगा जखमी झाला आहे. येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यात पाणी साचले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यास विलंब हाेत आहे. मात्र, पाऊस थांबताच तातडीने खड्डे बुजविण्यात येत आहेत. पावसाळ्यात डांबराचे प्रकल्प बंद असतात. त्यामुळे खड्डे डांबराने न बुजविता सिमेंट, कोल्ड मिक्स, खडी, पेव्हिंग ब्लॉकने बुजविण्यात येत आहेत. जलवाहिनीच्या कामांमुळे पडलेल्या खड्ड्यांबाबत ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याचे मुख्य अभियंता प्रमाेद ओंभासे यांनी सांगितले.