पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात लहान-माेठी ६७४ खासगी रुग्णालये, दवाखाने असून, त्यापैकी केवळ २६० रुग्णालयांकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आहे. उर्वरित ४१४ खासगी रुग्णालय चालकांनी व्यावसायिक अग्नि सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे उघडकीस आले आहे.

महापालिकेच्या अग्निशामक विभागाने अग्निशामक सुरक्षा सप्ताहांतर्गत मे महिन्यामध्ये शहरातील रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम राबवली. यामध्ये फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रेट, फायर लिफ्ट आणि आपत्कालीन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालय कर्मचाऱ्यांना महापालिकेने अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण, उपकरणांची नियमित देखभाल आणि ना-हरकत दाखल्याचे वार्षिक नूतनीकरण बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर २६० रुग्णालयचालकांनी अग्निशामक लेखापरीक्षण करून व्यावसायिक अग्नि सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र घेतले. पण, अजूनही ४१४ रुग्णालय चालकांनी प्रमाणपत्र घेतलेले नाही, अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास म्हणाले, ‘वारंवार आवाहन करून, नाेटीस देऊनही ४१४ रुग्णालय चालकांनी प्रमाणपत्र घेतले नाही. रुग्णालय चालकांनी अग्निशामक लेखापरीक्षण करून अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अग्निशामक विभागाकडून रुग्णालय चालकांना आवश्यक ती मदत केली जाईल.’ ‘महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे अग्निशामक लेखापरीक्षण करण्यात आले आहे. त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे,’ असे महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गाेफणे यांनी सांगितले.

डाॅक्टरांचे दुर्लक्ष

महापालिकेने रूग्णालयांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, त्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील डाॅक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले. मे महिन्यात झालेल्या अग्निशमन सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम राबवली. यामध्ये फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रेट, फायर लिफ्ट आणि आपत्कालीन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेषतः अतिदक्षता विभाग, प्राणवायू कक्ष आणि उच्च जोखमीच्या विभागांवर स्वतंत्र लक्ष देण्यात आले. रूग्णालय कर्मचाऱ्यांना महापालिकेने अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण, उपकरणांची नियमित देखभाल आणि ना-हरकत दाखल्याचे वार्षिक नूतनीकरण बंधनकारक असल्याचे समजून सांगितले.

शहरात ६७४ खासगी रूग्णालये

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या साेईसाठी शहरातील विविध भागात लहान-माेठी खासगी रूग्णालये, क्लिनिक डाॅक्टरांकडून सुरु केली जातात. शहरात एकूण लहान-माेठी अशी ६७४ रूग्णालये आहेत. रूग्णालय सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असताना डॉक्टरांनी प्रमाणपत्र घेतले नसल्याचे पाहणीत निदर्शनास आले. शहरातील ६७४ पैकी केवळ २६० रूग्णालयांकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र असून ४१४ रूग्णालयांकडे प्रमाणपत्र नाही.