पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५३६ खासगी रुग्णालयांनी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतले नसल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयचालकांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत प्रमाणपत्र न घेतल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाईचा इशारा महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिला आहे.
महापालिकेने रुग्णालयांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, त्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील डाॅक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले. नुकत्याच झालेल्या अग्निशामक सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम राबवली. यामध्ये फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रेट, फायर लिफ्ट आणि आपत्कालीन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेषतः अतिदक्षता विभाग, प्राणवायू कक्ष आणि उच्च जोखमीच्या विभागांवर स्वतंत्र लक्ष देण्यात आले. रुग्णालय कर्मचाऱ्यांना महापालिकेने अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण, उपकरणांची नियमित देखभाल आणि ना हरकत दाखल्याचे वार्षिक नूतनीकरण बंधनकारक असल्याचे समजून सांगितले.
शहरात ६७४ खासगी रुग्णालये
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टीने नागरिकांच्या साेईसाठी शहरातील विविध भागांत लहान-माेठी खासगी रुग्णालये, क्लिनिक सुरू केली जातात. अशी लहान-माेठी ६७४ रुग्णालये आहेत. रुग्णालयासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र बंधनकारक असते. शहरातील ६७४ पैकी केवळ १३८ रुग्णालयांकडे हे प्रमाणपत्र आहे.
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासगी रुग्णालयप्रमुखांची बैठक घेतली. ५० खाटा असणाऱ्या रुग्णालयांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचा डाॅक्टरांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात पाच खाटांच्या क्लिनिकलाही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.
