पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने चालू आर्थिक (२०२५-२६) वर्षातील दहा महिन्यांत ७०२ काेटी ७३ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. शहरातील सात लाख ३२ हजार २९६ मालमत्ताधारकांपैकी पाच लाख २३ हजार २०९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. आर्थिक वर्षातील ५४ दिवसांमध्ये दोन लाख नऊ हजार ८७ मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्याचे आव्हान विभागापुढे आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्याेगिक, माेकळे भूखंड, मिश्र अशा सात लाख ३२ हजार २९६ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांपैकी पाच लाख २३ हजार २०९ मालमत्ताधारकांनी ७०२ काेटी रुपयांच्या कराचा महापालिका तिजाेरीत भरणा केला आहे. विभागाला चालू आर्थिक वर्षात एक हजार काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
निवडणुकीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत करवसुली थंडावली होती. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ५४ दिवसांमध्ये करसंकलन विभागापुढे २९८ काेटी रुपये वसूल करण्याचे माेठे आव्हान आहे. ऑनलाइन पेमेंट प्रणाली, तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना घरबसल्या कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी त्यांना संदेश, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा सुरू केला आहे.
वाकडमधून सर्वाधिक कर
वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक ८७ कोटी ४४ लाख, तर पिंपरीनगर कार्यालयाने सर्वांत कमी पाच कोटी ७८ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. थेरगाव कार्यालयाने ६९ कोटी तीन लाख, चिंचवड – ४५ कोटी ४९ लाख, चिखली – ५४ कोटी २७ लाख, कस्पटे वस्ती – ४९ कोटी ९८ लाख, मनपा भवन – ३४ कोटी २१ लाख, भोसरी – ४४ कोटी ९१ लाख, सांगवी – ३५ कोटी २६ लाख, मोशी – ४३ कोटी ५२ लाख, पिंपरी वाघेरे – ४२ कोटी दोन लाख, किवळे – ४७ कोटी ८७ लाख, चऱ्होली – २७ कोटी २१ लाख, निगडी प्राधिकरण – १५ कोटी ६५ लाख, आकुर्डी – ३२ कोटी ९४ लाख, दिघी बोपखेल – २१ कोटी ४० लाख, तळवडे – १७ कोटी ६३ लाख, फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालयाने २८ कोटी १० लाख रुपयांची वसुली केली आहे.
चार लाख नागरिकांनी भरला ऑनलाइन कर
आतापर्यंत कर भरलेल्या पाच लाख २३ हजार २०९ मालमत्ताधारकांपैकी चार लाख तीन हजार ६५४ नागरिकांनी ४९२ काेटी ६० लाख रुपयांचा ऑनलाइन कर भरला आहे. विविध ॲपद्वारे २६ हजार ६८९ मालमत्ताधारकांनी २१ काेटी ३९ लाख, राेखीने ५६ हजार २३ जणांनी ५५ काेटी ९० लाख रुपयांचा भरणा केला आहे.
करआकारणी व करसंकलन विभागाने केलेले नियोजनबद्ध काम, नागरिकांचा वाढता सहभाग आणि वेळेत कर भरण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतींमुळे चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात वाढ झाली आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तातडीने मालमत्ताकराचा भरणा करावा उपायुक्त सचिन पवार म्हणाले.

