पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदारांनी मिळकतकर भरावा, यासाठी महापालिकेने विविध माध्यमांतून आवाहन केल्यानंतरही दोन लाख तीन हजार ७७२ मिळकतधारकांनी कराचा भरणा केला नाही. या मिळकतधारकांकडे ६२२ काेटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले असून, त्यांची नावे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाेंदणीकृत मिळकतींपैकी पाच लाख ६० हजार ४७३ मिळकतधारकांनी ८१७ काेटी ४३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. चालू आर्थिक वर्षात विभागाने एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. करवसुलीसाठी शहरात १८ विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. शहरातील एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये निवासी मिळकतधारक, दुकानदार, उद्योजक, मोकळ्या जमिनींचे मिळकतधारक, विविध संस्था, बँक आदी थकबाकीदार मिळकतधारकांची नावे प्रसिद्ध केली आहेत.
चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १३ दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त करवसुलीचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. थकीत मिळकतकर भरण्यासाठी साप्ताहिक, सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवली जाणार आहेत. आतापर्यंत वाकड, कस्पटे वस्ती, चिखली, चिंचवड आणि चऱ्होलीतील एक लाखापेक्षा जास्त रक्कम थकीत असलेल्या ८०० पेक्षा जास्त थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
८० मालमत्ता लाखबंद
करसंकलन विभागाने आत्तापर्यंत ८० पेक्षा जास्त मालमत्ता लाखबंद (सील) केल्या आहेत. या मिळकतधारकांनी त्यानंतरही कराचा भरणा न केल्यास मिळकती जप्त केल्या जाणार आहेत. आगामी आर्थिक वर्षात या मिळकतींचा लिलाव करण्याचे नियाेजन असल्याचे कर आकारणी विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. थकीत मिळकतकर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर ९० टक्के सवलत दिली जात आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त मिळकतधारकांनी लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त
तृप्ती सांडभाेर यांनी केले आहे.
