पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील (२०२६-२७) देयकांमध्ये गृहनिर्माण सोसायटीतील वाहनतळ, सुविधा क्षेत्रालाही (ॲमेनिटीज स्पेस) मिळकतकर लावण्यात आला आहे. त्यामुळे सोसायट्यांवर मिळकतकराचा भार वाढला आहे. मोठ्या सोसायट्यांचा खर्च सुमारे दोन लाखांनी वाढणार असून, या निर्णयाला सोसायट्यांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा कर आधीपासूनच लावण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे शहरातील ७ लाख ४४ हजार ६३० निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. त्यात सर्वाधिक संख्येने निवासी मिळकतींचा समावेश आहे. शहरातील लाखो मिळकतींची नोंद महापालिकेकडे नव्हती. त्यामुळे महापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून नोंद नसलेल्या आणि वापरात बदल केलेल्या मिळकतींचा शोध घेतला. त्यात साडेतीन लाखांपेक्षा अधिक नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या करसंकलन विभागाने केला आहे.
शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंटमधील एकत्रित वाहनतळाची नोंद मिळकतकरात नव्हती. खासगी संस्थेने सर्व सोसायट्या व अपार्टमेंटमधील वाहनतळ, उद्यान, क्रीडांगण, क्लब हाउस, व्यायाम शाळा, सभागृह, जलतरण तलाव, स्वच्छतागृहे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कंपोस्ट खत निर्मिती केंद्रांना निवासी दराने मिळकतकर लावला आहे. ती नोंद आता नव्याने यंदाच्या चालू आर्थिक वर्षातील सन २०२६-२७ च्या मिळकतकर देयकात सोसायट्यांचे वाहनतळ व सुविधा क्षेत्राला लावल्याचे निदर्शनास आले आहे.
मोठ्या सोसायट्यांना दोन लाखांचा कर
सुविधा क्षेत्रात उद्यान, बाग, क्रीडांगण, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्लब हाउसची सुविधा असते. तसेच, मोकळ्या जागेत झाडे लावलेली असतात. त्या सर्व जागांनाही मिळकतकर लावण्यात आला आहे. या नव्या रचनेनुसार, मोठ्या हाउसिंग सोसायट्यांना दीड ते दोन लाखांचा कर लावण्यात आला आहे. सदनिकाधारक आताच वर्षाकाठी दहा हजार ते ३० हजार रुपये मिळकतकर भरत आहेत. आता या नव्या करामुळे सदनिकाधारकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच, सोसायट्यांवरही मोठा भार पडणार आहे.
सोसायटीतील पाणी, कचरा, एसटीपीसाठी वर्षाला २० लाख रुपये खर्च करावा लागतो. वाहनतळ आणि सुविधा क्षेत्राला लावलेला मिळकतकर चुकीचा आहे. इतर महापालिकांमध्ये नाममात्र शुल्क आकारले जाते. हा निर्णय रद्द करण्याची मागणी नगरसेवकांकडे करणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी दिला आहे.
शहरातील सर्व सोसायट्या, अपार्टमेंटमधील वाहनतळ आणि सुविधा क्षेत्राला पूर्वीपासूनच मिळकतकर लावण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ज्या सोसायट्यांचे वाहनतळ, सुविधा क्षेत्राला मिळकतकर लावण्यात आला नव्हता, त्या सोसायट्यांंना तो लावण्यात आला आहे. त्यानुसार, सन २०२६-२७ च्या मिळकतकर देयकात तशी नोंद करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त
सचिन पवार यांनी सांगितले.
