Pune Pimpri Chinchwad Poisonous Liquor Death: पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर आता सात जणांपैकी चार जणांचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून तिघे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत, यानंतर आज पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ परिसरात अवघ्या काही तासांत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, आमदार रोहित पवार यांनी संतप्त कार्यकर्त्यांसह हडपसरमधील बेकायदेशीर दारू अड्ड्यावर धडक देत त्याची तोडफोड केली.
एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा अंत
फुगेवाडी येथे गुरुवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी पाच जण दगावल्याची वार्ता वार्यासारखी पसरली आणि परिसरात खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. एका भावाच्या मृत्यूचा तीव्र धक्का बसल्याने दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती त्यांच्या वडिलांनी दिली.
केमिकलयुक्त स्पिरिटपासून बनवली जीवघेणी दारू
प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी येथे केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक गावठी दारू तयार करण्यात आली होती. हीच जीवघेणी दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये भरून या दारूची सर्रास विक्री केली जात होती, ज्याच्या सेवनाने हा मोठा अनर्थ ओढवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
हडपसर आणि काळेपडळ परिसरात मृत्यूचे सत्र
पुण्यात मृत पावलेले पाचही नागरिक हडपसर परिसरातील रहिवासी होते. यातील एकाचा मृत्यू काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर उर्वरित मृत्यू हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. दारू पिऊन आल्यानंतर या नागरिकांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आमदार रोहित पवार आक्रमक; दारू अड्ड्याची तोडफोड
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह थेट संबंधित विषारी दारूच्या अडड्यावर धाव घेतली. संतापलेल्या रोहित पवारांनी स्वतः त्या अड्ड्याचा काऊंटर फोडला, तर कार्यकर्त्यांनी तेथील पत्रे उखडून टाकत संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला. या वेळी त्यांनी काही कुटुंबांशी संवाद साधला, यानंतर दारू अड्ड्याची आणि दारू विक्रीच्या ठिकाणाची रोहित पवार व कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. या सामूहिक नरसंहाराला जबाबदार असलेल्या दारू अड्ड्याच्या मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
“पोलीस मोठ्या माशांना वाचवत आहेत”; रोहित पवारांचा गंभीर आरोप
रोहित पवारांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. “पोलिसांना विचारले असता ते म्हणतात की अजून कारण समजलेले नाही. पोलीस कोणाची तरी पाठराखण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पुढचा तपास होऊ नये, म्हणूनच एका आरोपीला स्वतःहून शरण यायला सांगितले गेले आहे, जेणेकरून मुख्य सूत्रधार म्हणजेच ‘मोठा मासा’ यातून सुटू शकेल,” असा गंभीर आरोप पवारांनी केला.
या मृत्यूप्रकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. विषारी दारुमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते”, असे मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. प्रकरण अतिशय संवेदनशील असून, कोणाचीही गय करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
