पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर पाऊस सुरू हाेता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा तडाखा वाढला होता. कडक ऊन्हामुळे दिवसभर नागरिक घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघत हाेते. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. दुपारनंतर वातावरणात ढग दाटून आले. दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, मोशी, सांगवी, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर परिसरात जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते निगडी दरम्यान महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या खड्ड्यात पाणी साचले होते. चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी पुलाखाली पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती.
भोसरीत नाराळाच्या झाडावर वीज कोसळली
भोसरीतील गव्हाणे येथील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली होती. त्यामुळे आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. रुपीनगरमध्ये उच्चदाब वीजवहिनी जमिनीवर आली आहे. हाताला लागेल अशा अंतरावर तार लोंबकळत आहे.
झाडपडीच्या घटना
वादळी वाऱ्यामुळे शहरात ११ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. वाल्हेकरवाडीत एक मोटारीवर झाड पडले. मोशी, दापोडी, चोवीसावाडी, संभाजीनगर, बर्ड व्हॅली, सेक्टर २६, रुपीनगर, आकुर्डी रेल्वे स्थानक, रावेत आणि मारुंजी अशा ११ ठिकाणी झाडे पडली असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी व्यंकटेश दुर्वांस यांनी सांगितले.
