पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील रस्ते जलमय झाले असून साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक संथ हाेऊन काेंडीत भर पडत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरातही पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २३.९० टक्के पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांत शहरात २७ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, माेशी, निगडी, आकुर्डी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे या सर्वच भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्राेचे काम सुरू आहे, तर जलवाहिनीच्या कामासाठी बीआरटी मार्गात खाेदाईमुळे माेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाणी साचले होते. वाहतूक संथ झाली होती.

महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले, की शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोठेही घरात पाणी शिरले नाही. सखल भागात साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा हाेत आहे. पवना आणि मुळा यांच्या तुलनेत इंद्रायणी नदीचे पाणी वाढले आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोड येथे झाड उन्मळून पडल्याने एक जण जखमी झाल्याचेही ते म्हणाले.

वाहतुकीची कोंडी

शहरातील विविध भागांत शुक्रवारी १२ आणि शनिवारी १५ अशा झाडपडीच्या २७ घटना घडल्या. चिंचवड, भोसरी, निगडी, पिंपरी, फुगेवाडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पूर्णानगर, किवळे गावठाण, मोशी, कासारवाडी, दापोडी, आकुर्डी परिसरात झाडे पडली होती. अग्निशामक दलामार्फत तत्काळ झाडे बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केल्याचे अग्निशामक विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

धोकादायक झाडांची माहिती देण्याचे आवाहन

शहरात पाऊस सक्रिय झाला आहे. झाड उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडणे अशा घटना घडू शकतात. वाहन झाडाखाली उभे करू नये. वादळी वातावरणात झाडाखाली थांबणे टाळावे. एखादे झाड धोकादायक स्थितीत असल्याचे किंवा झाडाच्या फांद्या पडण्याचा धोका असल्याचे आढळल्यास त्याची माहिती तत्काळ महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागास देण्याचे आवाहन वृक्षाधिकारी महेश गारगोटे यांनी केले आहे.

महापौरांच्या सूचना

सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क राहावे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. उघडे मॅनहोल, पाणी साचणारी ठिकाणे, धोकादायक झाडे, विद्युत धोक्याची ठिकाणे, तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकणाऱ्या प्रत्येक बाबीवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

धरणात २४ टक्के पाणीसाठा

पावसाने धरण परिसरात हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून मावळ परिसरात संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा २३.९० टक्के झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत ४४० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
दरम्यान, मागील वर्षी आतापर्यंत ७१.४८ टक्के पाणीसाठा धरणात झाला होता.