पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहर जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले आहे. नदी काठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निगडीतील भेळ चौक परिसरात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या बाजूला एक संरक्षण भिंत होती. दुपारी एकच्या सुमारास ही भिंत कोसळली. बाजूच्या गृहप्रकल्पावर काम करणारे जुलू बिस्वास हे कामगार किरकोळ जखमी झाले असून सुनील बैठा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये झाडपडीच्या ३८ घटना

शहरातील संभाजीनगर, भोसरी, निगडी, आकुर्डी, पिंपरी संत तुकारामनगर, दापोडी, चिंचवड आणि डुडूळगाव अशा ११ ठिकाणी रविवारी झाडे पडली. शहरात मागील तीन दिवसांत झाडपडीच्या ३८ घटना घडल्या आहेत.

शहर जलमय, अनेक ठिकाणी घरामध्ये शिरले पाणी

वाकडम, भूमकर चौक, ताथवडे व पुनावळे भुयारी मार्ग, किवळेतील सिंबायोसिस भुयारी मार्ग, फुगेवाडी भुयारी मार्ग, नाशिक फाटा, शंकरवाडी लोहमार्गाखालील भुयारी मार्ग, वल्लभनगर भुयारी मार्ग; पिंपरीतील खराळवाडी ते मोरवाडी, चिंचवड स्टेशन येथील अहिंसा चौक ते महावीर चौक व आकुर्डीतील खंडोबा माळ समतल विलगक (ग्रेडसेपरेटर), आकुर्डीतील बजाज कंपनीसमोरील भुयारी मार्ग, निगडीतील मधुकरराव पवळे उड्डाणपूल मुंबईकडील बाजू, थेरगाव डांगे चौक, लोहमार्गाखालील भुयारी मार्ग, टिळक चौक निगडी, खंडोबा माळ पाण्याच्या टाकीजवळ आकुर्डी, महापालिकेच्या आकुर्डीतील कुटे रुग्णालयासमोरील रस्ता अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

शहरातील ४५ हून अधिकठिकाणी पाणी साचले आहे. घरकुल, संजय गांधीनगर झोपडपट्टी, तानाजीनगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असल्याचे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.