पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रक्कम वसुलीत ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या क्रीडा प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाड्याने देताना महापालिका क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी ५० लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात निदर्शनास आले आहे. अनामत रक्कम, भाडे वसुली, सामान्य पावती, इतर भाडे व आकार पावती, भाडे वसुलीची परस्पर विल्हेवाट लावणे, इतर साहित्य साधनसामग्रीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे

का, भाडे वसुली प्रकरणातील गैरव्यहाराची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येत आहे, असे विविध प्रश्न आमदार जगताप यांनी विचारले होते.त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाड्याने देताना महापालिकेच्या क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांनी ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला आहे.

अनामत रक्कम, भाडे वसुली, पावत्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. सन २०१८-२०१९ ते २०२३-२०२४ या कालावधीच्या लेखापरीक्षणात प्रेक्षागृहाच्या लिपिक, मुख्य लिपिक असलेले प्रभारी व्यवस्थापक यांच्याकडून महापालिकेची येणे वसूलपात्र व आक्षेपाधिन रक्कम कोषागरात जमा झाल्याचे दिसून येत नाही.

याबाबत एका लिपिकाला निलंबित करुन विभागीय चौकशी करण्यात आली आहे. आक्षेपाधिन रकमेबाबत प्रेक्षागृहातील हजेरी पुस्तकावरुन प्रत्यक्ष कार्यरत व्यवस्थापक, लिपिक यांचा कर्तव्यनिहाय कालावधी निश्चित केला आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. त्यावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

प्रशासनाकडून चौकशी सुरू

क्रीडा विभागाने हा अहवाल पुढील चौकशी व कारवाईसाठी प्रशासनाकडे पाठविला आहे. सुरुवातीला सुमारे २० लाख रुपयांच्या अपहाराचा संशय होता. मात्र, तपासात हा आकडा वाढत गेला. त्यानुसार ४२ लाख ६८ हजार २१५ रुपये वसूलपात्र आणि ८ लाख ३ हजार ४११ रुपये आक्षेपाधीन ठेवण्यात आले आहेत. नाट्यगृह भाड्याने देताना १५ दिवस आधी अनामत रक्कम घेण्याची नियमावली असताना ती पाळली गेली नाही. धनादेश वेळेत सादर न केल्यामुळेही आर्थिक नुकसान झाले.

कार्यक्रम नोंदीत तफावत

क्रीडा विभागाने १ एप्रिल ते २७ जुलै २०२३ या कालावधीची प्रातिनिधिक तपासणी केली. विद्युत विभागाच्या नोंदीनुसार या काळात १४० कार्यक्रम झाले होते. मात्र, प्रेक्षागृह कर्मचाऱ्यांच्या नोंदीत केवळ ३५ कार्यक्रम दाखविण्यात आले. हा प्रकार गंभीर असल्याने मोरे प्रेक्षागृहासह इतर नाट्यगृहांमध्येही अशा गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकरणात एकाची चौकशी झाली आहे. याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासनाला सादर केला आहे. पुढील कारवाई या विभागाकडून केली जाईल, असे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.