पिंपरी : रावेत येथील फर्निचर मॉलच्या मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्याची सुपारी सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीने तुरूंगातून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. चंदिगढ येथे तिघांना पिस्तूल आणि २३ काडतुसे देण्यात आली होती. सोनीपत येथे त्यांचा गोळीबार करण्याचा सराव झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
परविन रामनिवास (२२), पंकज कुलदीप (२१), सागर अजयपाल (२१, सर्व रा. हरियाणा) यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने हरिद्वार येथून अटक केली. त्यांना बुधवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड मध्ये आणण्यात आले. न्यायालयाने आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपी कुलदीप उर्फ कशीश याने तुरुंगातून संपर्क करीत रावेत येथील गोळीबार प्रकरणातील आरोपींना सुपारी दिली. १४ मे रोजी तीनही आरोपी पिंपरी-चिंचवडमध्ये आले आणि १५ मे रोजी त्यांनी रात्री गोळीबार केला आणि पळून गेले. अटक केलेल्या आरोपींना लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशिश यांनी संपर्क केला. कुलदीप हा सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तो सध्या तुरुंगात आहे.
बिश्नोई टोळी विरुद्ध खून, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. आरजू बिश्नोई याने आरोपींना दोन पिस्तूल, २३ काडतुसे हस्तकामार्फत पुरवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींना अडीच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यातील ५० हजार रुपये सागर अजयपाल याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला आग
थेरगावातील लक्ष्मणनगर परिसरात गुरुवारी (२१ मे) दुपारी दोन वाजताच्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागली. धाईंजे शाळेजवळील भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे लोळ आणि धुराचे मोठे लोट दूरवर दिसत होते. अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
ट्रान्सफॉर्मर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यातूनच आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रान्सफॉर्मरमधून मोठ्या आवाजासह ठिणग्या उडू लागल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली.
त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. विद्युत पुरवठा खंडित केल्याची खात्री झाल्यानंतर जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग जवळील वस्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. विशेष म्हणजे, या ठिकाणी यापूर्वीही कचऱ्यामुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
