पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमध्ये थेट नाल्यांद्वारे सांडपाणी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, सांडपाणी थेट नाल्यात सोडणाऱ्या सोसायट्यांची यादी तयार केली जाणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद असलेल्या, नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत महापौर रवी लांडगे यांनी मंगळवारी प्रशासनाला तसे आदेश दिले.

किवळे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून नाल्यांद्वारे थेट पवना नदीत सांडपाणी सोडण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, महापौर लांडगे यांनी पाहणी केली. सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांचे सर्वेक्षण करून कारवाईचा आदेश महापौरांनी दिला. त्यानुसार, प्रशासनाने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

‘सोसायट्यांनी एसटीपी तत्काळ कार्यान्वित करावेत. नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करावी. नाल्यांद्वारे नदीत जाणाऱ्या सर्व बेकायदा जोडण्या शोधून तत्काळ बंद कराव्यात. पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्या, संस्थांवर दंड आकारून आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी,’ असे आदेशही महापौर लांडगे यांनी दिले.

महापौर म्हणाले, ‘प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बाग, वाहने धुण्यासाठी करण्याची सक्ती करावी. संबंधित क्षेत्रातील अभियंते व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी. दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करावे. तांत्रिक साधनांचा वापर करून सतत देखरेख ठेवावी.’

पिंपरी-चिंचवडमधील नद्या

  • शहरातून वाहणाऱ्या नद्या : पवना, इंद्रायणी आणि मुळा
  • शहरासाठी विशेष महत्त्वाची : पवना
  • पवना या भागांतून वाहते… : किवळे, मामुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, फुगेवाडी, सांगवी, दापोडी.
  • पवनेच्या पात्राची लांबी : २४.४० किलोमीटर
  • पवना नदीच्या दोन्ही बाजूंचे काठ शहरात.
  • पवना नदीचा दापोडी येथे मुळा नदीत संगम.
  • इंद्रायणी नदीची शहरातील लांबी : २०.८५ किलोमीटर
  • मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते.

प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच शहरातील नद्या स्वच्छ व प्रदूषणमुक्त होतील. नद्यांचे प्रदूषण रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून, यापुढे कोणत्याही प्रकारची बेफिकिरी सहन केली जाणार नाही. नाल्यांद्वारे थेट सांडपाणी नदीत सोडणे हा गंभीर पर्यावरणीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निश्चित कालमर्यादेत परिणाम दिसतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.

एसटीपी बंद ठेवून सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांचे सर्वेक्षण केले जाईल. अशा सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.