पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने कारवाईची भूमिका घेतली आहे. ‘आरएमसी’ प्रकल्प, बांधकाम स्थळे, तसेच बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी धूळ व वायुप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा आदेश पर्यावरण विभागाने दिला आहे. उपाययाेजना न केल्यास आरएमसी प्रकल्प लाखबंद (सील) करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूंनी झपाट्याने वाढत असून, टाेलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. महापालिकेची विविध विकासकामे, मेट्राे प्रकल्पाचेही काम सुरू आहे. त्यामुळे हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सध्या १०० ते १५० या श्रेणीत आहे. काही भागात हवेची गुणवत्ता सातत्याने कमी-जास्त हाेत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवे आणि अधिक कठोर मार्गदर्शक नियम लागू केले आहेत. मात्र, प्रकल्पचालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व आरएमसी प्रकल्पधारक, बांधकाम व्यावसायिक, तसेच बांधकाम साहित्य पुरवठादार यांनी धूळ व वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. संबंधित आस्थापनांची महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.

आरएमसी प्रकल्पांसाठीची नियमावली

प्रकल्पांमधील धूळ आटोक्यात ठेवण्यासाठी डस्ट कलेक्ट मशिन, वाळू, सिमेंट, खडीची बंदिस्त स्वरूपात वाहतूक करणे, परिसरात धूळ पसरू नये, म्हणून प्रकल्पाच्या चारही बाजूंनी २० फुटांपर्यंत पत्रे असणे आवश्यक आहे. राडारोड्यावर आच्छादन करावे. प्रकल्पामधील धुळीवर नियंत्रणासाठी पाणी शिंपडावे, साहित्य बाहेर घेऊन जाताना आणि येताना वाहनांची चाके पाण्याने धुणे आवश्यक आहे.

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जोपर्यंत आस्थापनाचालक उपाययोजना करीत नाहीत, तोपर्यंत आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. लाखबंदीची कारवाई केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.