पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान १२ प्रकल्पांची पाहणी करण्यात येऊन पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे सात प्रकल्प लाखबंद (सील) करण्यात आले.

महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम व औद्योगिक आस्थापनांकडून होणाऱ्या धूलिकणांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी आणि धडक कारवाया सुरू आहेत. याच अनुषंगाने महापालिकेच्या उपद्रव शोधपथकांमार्फत शहरातील ‘आरएमसी’ प्रकल्पांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या सात प्रकल्पांवर लाखबंदीची कारवाई केली.

गंभीर त्रुटी

या प्रकल्पांमध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, तसेच, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या. उर्वरित पाच प्रकल्पांमध्येही काही त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधितांना कडक इशारा देण्यात आला आहे.

‘आरएमसी’ प्रकल्पासाठीचे नियम

  • प्रकल्प परिसरात धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टीम अनिवार्य.
  • मिक्सिंगचे काम झाकलेल्या जागेतच करावे.
  • चालत्या वाहनांमधून धूळ उडू नये म्हणून काळजी घ्यावी.
  • वाहनांचे टायर धुवावेत.
  • हवेतील धूलिकणांचे मोजमाप व नियंत्रणासाठी नियमित अहवाल सादर करावा.
  • आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी.
  • प्रकल्प परिसरात शेड उभारणे.
  • धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे.

वायुगुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. औद्योगिक, तसेच बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा कारवायांना पुढील काळातही अधिक गती दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

आरएमसी आणि बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तत्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल, असे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.