पिंपरी : मोबाइलवर बोलत चाललेल्या सिमेंट मिक्सर चालकाच्या बेदरकारपणामुळे मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात सायकलस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथे एसकेएफ कंपनीजवळ गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली, तर बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे-आळंदी पालखी मार्गावर बोपखेल येथे ट्रेलरच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

चिंचवड येथील अपघातात फारूख ऊर्फ रेहान शकील तांबोळी (वय १५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. त्याचे वडील शकील तांबोळी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिक्सरचालक निवृत्ती उद्धव गिरी (वय ३९, रा. पद्मावती रस्ता, आळंदी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूख हा चिंचवड येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर तो सायकलवरून घरी चालला होता. एसकेएफ कंपनीजवळ पाठीमागून मोबाइलवर बोलत आलेल्या सिमेंट मिक्सरवरील चालकाने सायकलवर चाललेल्या फारूखला धडक दिली. यात मिक्सरखाली चिरडल्याने फारूखचा जागीच मृत्यू झाला.

बोपखेल येथील अपघातात सुरेश बाबूराव गोरडे (वय ७२, रा. परांडेनगर, दिघी) यांचा मृत्यू झाला. गोरडे हे बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दिघी गावठाण येथे पुणे-आळंदी रस्त्याने पायी चालले होते. त्या वेळी भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ट्रेलरचालकाला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात अजय अशोक जाधव (वय २०, रा. गोडाऊन चौक, भोसरी) या चालकाचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा एका बांधकामाच्या ठिकाणी ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तो टेल्को रस्त्याने गवळी माथा येथून ट्रॅक्टर घेऊन चालला होता. अनुकूल चौकात अचानक ट्रॅक्टर पलटी होऊन खड्ड्यात कोसळला. यात ट्रॅक्टरखाली सापडल्याने अजय गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.