पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील इमारतींच्या गच्चीवर (रूफटॉप) असलेल्या हॉटेलचालकांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गच्चीवरील हॉटेलचे पुन्हा एकदा सर्वेक्षण हाती घेतले आहे. सर्वेक्षणानंतर नियमांचे उल्लंघन करणारे, अनधिकृत हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सन २०२३ मध्ये अशा गच्चीवरील हॉटेलचे सर्वेक्षण केले हाेते. या सर्वेक्षणात शहरातील विविध भागांत तब्बल ४९ गच्चीवरील हॉटेल आढळून आली हाेती. त्यांपैकी अनेक हाॅटेल बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले हाेते. महापालिकेने त्या हाॅटेल व्यावसायिकांना नाेटीस दिली. तसेच विविध परवानग्या घेण्यासाठी मुदत दिली हाेती, तर अनधिकृत असलेल्या नऊ हाॅटेलवर कारवाई केली हाेती. मात्र, मागील अडीच वर्षांत शहरात पुन्हा नव्याने गच्चीवरील हॉटेलची संख्या वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, निगडी, प्राधिकरण, स्पाइन रोड, भोसरी या परिसरात गच्चीवरील हॉटेलची संख्या मोठी आहे. इमारतीच्या गच्चीवर कोणतीही परवानगी न घेता हॉटेल अनधिकृतपणे चालविली जात आहेत. नियमांचे पालन केले जात नाही. पुरेशी अग्निशामक यंत्रणा नसते, अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा गच्चीवरील हॉटेलचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बेकायदा सुरू असलेल्या अशा हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरातील गच्चीवरील हॉटेलचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या हाॅटेलचालकांनी परवानगी घेतली आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे. परवानगी न घेतलेल्या हाॅटेलवर कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभाेर यांनी सांगितले.