पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाताना नोंदणी क्रमांक लपवता येईल अशी ‘मोटराइज्ड’ यंत्रणा बसवलेल्या एका मोटारीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई केली आहे. साडेचार हजार रुपये दंड आकारून मोटारीवरील यंत्रणा काढण्यात आली आहे.
‘मोटराइज्ड’ यंत्रणेचा वापर करणारी मोटार महामार्गावरून जात असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदणी क्रमांकाच्या मोटारीचा मागोवा घेतला. मालकाच्या कायमस्वरूपी पत्त्यावर जाऊन मोटारीची तपासणी केली. मोटार चालताना नोंदणी क्रमांक मुद्दाम लपवण्यासाठी एक यंत्रणा बसवल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. ही यंत्रणा बसवण्यामागे महामार्गावर वेग मोजणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे होणारी स्वयंचलित वाहतूक अंमलबजावणी आणि ‘ई-चलान’ची कारवाई टाळणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘पथकर नाक्यावर मोटारीचा नंबर स्पष्ट दिसत होता. महामार्गावरून जाताना क्रमांक लपवण्यासाठी एक यंत्रणा बसवण्यात आली होती. या वाहनाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. वाहनावर बसविण्यात आलेली यंत्रणा काढण्यात आली आहे. चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले.
मोटारीचा नंबर कसा झाकला जात होता?
महामार्गाने जाताना मोटारीच्या नोंदणी क्रमांकाच्या पाटीवर (नंबर प्लेटवर) एक काळे ‘मोटराइज्ड’ आवरण खाली येताना आणि पाटी पूर्णपणे झाकली जाताना दिसत होते. ही यंत्रणा ‘पुश-बटण’ प्रणालीद्वारे चालवली जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
