शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसैनिकांनामध्ये नाराजी असून ते आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन बंड केला आहे. यामुळं राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आज आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थित बैठक पार पडली. त्यात शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत भावनांना मोकळी वाट करून दिली. गद्दारांना क्षमा नाही असं प्रत्येक शिवसैनिकांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

…यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातंय – सचिन आहिर

शिवसेना शहर संघटक उर्मिला काळभोर म्हणाल्या की, “गद्दारांना क्षमा नाही, कोणी बापाच्या खांद्यावर बसला म्हणून मोठा होत नाही. आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेच्या पाठिशी उभे आहोत. पिंपरी-चिंचवड शहरात बंडखोर आमदार नाही त्यामुळं आम्ही शांत आहोत. पिंपरी-चिंचवड, मावळमधील शिवसैनिक पक्षाच्या पाठीशी खंबीर उभा आहे.” तर, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, “शिवसेनेसाठी हा सत्वपरीक्षेचा काळ आहे. शिवसेनेच्या महिलांचा तळतळाट देवेंद्र फडणवीस यांना लागेल. त्यांनी समोरासमोर लढून सत्ता घ्यायला हवी होती. पक्ष प्रमुखांच्या डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे आम्हाला वाईट वाटलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे लक्ष द्याल, हाच तो काळ आहे. सर्वात मोठा शत्रू भाजपा आहे, त्याच्यासोबत लढायला तयार राहा.” असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.