पिंपरी : उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत हाेता.
अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी ३४ वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते हाेते. त्यांच्या दुरदृष्टीतूनच शहराचा विकास झाला. त्यांचे शहरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांशीही सलोख्याचे संबंध होते. विकास कामानिमित्त शहराच्या विविध भागातील रस्त्यांवरुन अजित पवार फिरत असे. त्यामुळे शहरातील नागरिकांशीही त्यांचे वेगळे नाते निर्माण झाले होते.
पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला पिंपरी कॅम्प, चिंचवड, नेहरूनगर, संत तुकारामनगर, निगडी, भाेसरी, माेशी भागातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. पिंपरीतील भाजी मंडई, फळांची बाजारपेठही बंद होती. दुकाने बंद असल्याने शहरातील अनेक भागात, प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत हाेता.
पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीचे शिल्पकार
बारामती माझी जन्मभूमी असली, तरी पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी असल्याचे निक्षून सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या शहरावर नितांत प्रेम होते. त्यांनी शहराचा नियोजनबद्ध विकास केला. ग्रामीण भाग असलेल्या पिंपरी-चिंचवडचे शहरीकरणात रूपांतर करण्यात पवार यांच्या दृरदृष्टीचा मोठा वाटा राहिला. शहरातील प्रत्येक परिसराची त्यांना माहिती होती.
पक्षातील कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत असत. शहरातून अनेक नेते त्यांनी घडविले. पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासकामांचा पवार यांच्याकडून राज्यभर दाखला दिला जात होता. त्यामुळे अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असे एक समीकरण तयार झाले होते. ३४ वर्षांनी हे समीकरण तुटले आहे. शहरावर मनापासून प्रेम करणाऱ्या अजितदादांच्या निधनामुळे शहर पोरके झाल्याची भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
