पिंपरी : शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली असून, विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत तब्बल सहा लाख ८ हजार ९२७ मतदारांची नावे वगळली आहेत. त्यामुळे शहरातील एकूण १७ लाख २४ हजार ५३७ मतदारांपैकी ११ लाख १५ हजार ६१० मतदार राहिले आहेत. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत पडताळणी व दुरुस्तीची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात पिंपरी, चिंचवड आणि भाेसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. मतदारसंघनिहाय आकडेवारीचा विचार करता, चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख ८७ हजार ४४८ मतदारांपैकी तब्बल २ लाख ७० हजार २३ मतदार वगळले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये ४ लाख १७ हजार ४२५ मतदार राहिले आहेत, अशी माहिती मतदार नाेंदणी अधिकारी संदीप खाेत यांनी दिली. पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४ लाख १ हजार १७५ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ६९७ मतदार वगळले आहेत. २ लाख ३६ हजार २८७ मतदारांची नावे यादीत राहिली आहेत, अशी माहिती मतदार नाेंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी दिली. तसेच सुनावणी घेण्यासाठी ३८ ठिकाणे निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.
भोसरी मतदारसंघात ६ लाख ३५ हजार ११४ पैकी १ लाख ७३ हजार २०७ मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता भाेसरीत ४ लाख ६१ हजार ९०७ मतदारांचा समावेश असल्याची माहिती मतदार नाेंदणी अधिकारी सचिन पाटील यांनी दिली. निवडणूक विभागाने नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्राप्त अर्जांचे २१ ऑक्टोबरपर्यंत निवारण करून ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप यादीत नाव नसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता नवीन नाव नोंदणीसाठी नमुना ६ आणि दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज भरावा. तसेच नावाचे स्पेलिंग, नातेवाईकांचे नाव, जन्मतारीख, लिंग, छायाचित्र, पत्ता, ईपीआयसी क्रमांक यादीत आहे का, याची अचूक पडताळणी करून घ्यावी. आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वेळेत आपल्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावाची खात्री करणे आवश्यक आहे.
