पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डन येथे सार्वजनिक सायकल शेअरिंग उपक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
‘जगभरातील ६६ देशांमधून आठ शहरांची या उपक्रमासाठी निवड झाली. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला. नागरिकांना जवळच्या अंतरासाठी किफायतशीर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय याद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा राइडशेअर प्रकल्प युरोपीय मानकांनुसार तयार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थांतर्गत या प्रकल्पाचा समावेश असून, त्याद्वारे प्रकल्पाचे नियंत्रण केले जात आहे,’ असे शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
स्मार्ट सायकली उपलब्ध
‘स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीची नवी ओळख निर्माण करणारा हा प्रकल्प असून, शहराला आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित वाहतूक व्यवस्था देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. उच्च दर्जाच्या स्मार्ट सायकली येथे उपलब्ध आहेत. डॉक-आधारित चार्जिंगची सुविधा आहे,’ असेही गायकवाड यांनी सांगितले.
महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक सायकल शेअरिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. असा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील ६६ देशांमधून ८ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे यांच्यासह सह शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
