पिंपरी : ‘अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. निर्यातक्षम पक्का व कच्चा माल बंदरामध्ये पडून आहे. ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. गॅस तुटवड्यामुळे आठ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एसएमईएस) संकटात सापडले आहेत. तीन दिवसानंतर टप्प्याटप्प्याने कंपन्यांमधील काम थांबेल,’ अशी भीती लघुउद्योजकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव यावेळी उपस्थित होते. ‘औद्योगिक गॅस पुरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा. अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय नाही,’ असे बेलसरे म्हणाले.

‘शासनाने सध्या औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा पूर्ण थांबविला आहे. कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे इंधन गॅस स्वरूपात वापरले जाते. फॅब्रिकेशन, पावडर कोटींग, सीडी कोटींगसाठी एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे औद्योगिक परिसरातील जवळपास आठ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. औद्योगिक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योजक उत्पादन वेळेवर तयार करू शकत नाहीत. उत्पादन खर्चात वाढ होत आहे, ऑर्डर वेळेत देऊ शकत नाहीत,’ असे सातव म्हणाले.

‘पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण व रांजणगाव औद्योगिक परिसरातील बहुतांश लघु उद्योजक हे बजाज, महिंद्रा, थरमॅक्स व इतर मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांवर अवलंबून आहेत. लघु उद्योजक जाचक वस्तू व सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी, महागाई, करोना काळातील टाळेबंदी, बँकेचे कर्ज, थकलेले हप्ते यातून अद्याप सावरले नाहीत. आता युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पुरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा. औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे,’ अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

गॅसचा तुटवडा, कंपन्यांना कोट्यवधींचा फटका

औद्योगिक गॅसच्या तुटवड्यामुळे येथील हजारो कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. १८०० रुपयांचा सिलिंडर पाच हजार रुपयांना खरेदी करावा लागत आहे. मात्र, हा साठादेखील मर्यादित आहे. पुढील काही दिवसात चढ्या दराने मिळणारे सिलिंडरदेखील मिळणे बंद होणार आहे. करोनानंतर आता पुन्हा हे संकट आल्यामुळे उद्याेजकांचे माेठे नुकसान हाेत असल्याचे पदाधिकऱ्यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची म्हटले जाते. मात्र, या अर्थव्यवस्थेला दहा दिवसांत उद्योग बंद करण्याची वेळ येत आहे. व्यावसायिकांच्या नुकसानीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ते पुढील काही दिवसांत पूर्ण होईल. लघुउद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून हा कणा ताठ ठेवण्यासाठी गॅस सिलिंडर पुरवठा सुरू करावा, असे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले.