पिंपरी : वाकड, चिखली आणि पिंपरी परिसरातील सुपरमार्टमध्ये तूप, काजू, बदाम अशा महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला. चार महिलांसह सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविकांत देवानंद जाकरे (३२, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), ब्रिजेश सिताराम मदेशिया (२५, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), ब्रिजेश बाळु यादव (३५, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई), सोनम बाबु शेख (३५, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), सलमा शकिल शेख ( ५१ , भोसरी, पुणे), सानिया बाबुमिया शेख (२०, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) आणि रूमा ब्रिजेश मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) कशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी याबाबत माहिती दिली. वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील स्टार सुपरमार्केट मध्ये २९ ऑगस्ट रोजी आणि कलाटे वस्ती येथील सुपरमार्केट मध्ये १२ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी सुपर मार्केट मधून ४२ हजार १०० रुपये किमतीचे गोवर्धन तूप, काजू, बदाम असे साहित्य चोरून नेले होते. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोटार मुंबईच्या दिशेने गेल्याची आणि पुन्हा पिंपरी-चिंचवड परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने जाळे रचून ताथवडे-वाकड परिसरातून संशयित मोटार व एक ऑटो रिक्षा ताब्यात घेतली. वाहनातील आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस हवालदार वंदु गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, पोलीस शिपाई कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे, मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.