पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध विभागांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. कचराकुंडीमुक्त परिसरासाठी विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली आहेत. ओला-सुका कचरा वेगळा करणे, स्वच्छ रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर विशेष भर दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

केंद्रीय नगर कामकाज मंत्रालयामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ प्रक्रिया सुरू आहे. एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू होईल. सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवण्यासाठी कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातून १०० टक्के कचरा वेगळा करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सांगितले.

ओला, सुका, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा वेगळा न करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कचरा वेळेवर उचलला जावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण होऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून सतत देखरेख ठेवली जाणार आहे.

शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि अंतर्गत रस्त्यांवर विशेष स्वच्छता मोहीम, कचराकुंडीमुक्त परिसरासाठी विशेष स्वच्छता पथके तैनात केली जाणार आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणी-वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर लक्ष, शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, फेरी आणि जनजागृती कार्यक्रम आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कचरा वेगळा करण्याबाबत आणि स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती महापालिकेकडून केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.

‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम

सर्वेक्षणात या वर्षी ‘स्वच्छ शहर जोडी’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिका इतर प्रगत शहरांच्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून त्या पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा अभिप्राय शहराच्या क्रमवारीसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता ॲप किंवा स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर सकारात्मक अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. कचरा संकलन, विलगीकरण, प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर भर आहे, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहरांमध्ये अग्रस्थानी आणण्याचा निर्धार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरण करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे महापौर रवी लांडगे म्हणाले.