पिंपरी : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरात आज, शुक्रवारपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्व महापालिका आणि इतर संबंधित संस्थांनी पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि काटकसरीच्या वापरासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नवीन गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या नळजोडाला विद्युत पंप लावून पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधित विद्युत पंप जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, वॉशिंग सेंटर आणि इतर मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत. व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प आणि इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी. घरगुती वापर, शाळा आणि रुग्णालये यांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा महापालिका प्रशासनाने दिला.

बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर बंधनकारक

बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी कूपनलिका (बोअरवेल) पाण्याचा वापर न करता महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचाच वापर करावा. नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसून ते विहिरीत अथवा टाकीत साठवून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांनी हा प्रकार तातडीने बंद करावा. अशा प्रकारचा अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. सर्व्हिस सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळजोड वापरला जात असल्यास तो तातडीने बंद करण्यात येईल. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा

पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर

भामा आसखडचे काम संथगतीने

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदार बदलण्यात आला असून त्याला नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.