पिंपरी : ज्वलनशील सोडीयम नायट्रेट हे विषारी औषध कोळशावर टाकून त्याचा धूर घेऊन एकाच उच्चशिक्षित कुटुंबातील पती, पत्नी व मुलीने आत्महत्या केली. पतीचा शनिवारी मृत्यू झाला, तर अत्यवस्थ माय-लेकीचा वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यु झाला. आर्थिक विवंचनेतून तिघांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनोद पिल्ले (वय ५०), सिलजा पिल्ले (वय ४५) आणि पूर्णिमा पिल्ले (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, अजमेरा कॉलनी, पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री तिघांनी सोडीयम नायट्रेट हे विषारी औषध पेटत्या कोळशावर टाकत त्यांचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्याने तिघेही जण बेशुद्ध झाले. शनिवारी ही घटना उघडकीस आली. बेशुद्ध अवस्थेतील तिघांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर सिलजा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही रविवारी मृत्यू झाला.
आत्महत्येपूर्वी विनोद यांनी सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये आपण सर्वजण स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या करीत असलो तरी यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असेही त्या चिठ्ठीत म्हटले होते. आत्महत्या केलेले तिघेही जण उच्चशिक्षित होते. मृत विनोद यांनी आयआयएम अहमदाबाद येथून मास्टर इन कॉप्युटर सायन्सचे शिक्षण घेतले होते. ते पीएचडीधारकही होते. मुलगी पूर्णिमाही चिंचवड येथील एका महाविद्यालयात कॉप्युटर सायन्सच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होती, तर, आई सिलजा या मोरवाडीतील एका शाळेत समन्वयक म्हणून काम पाहत होत्या, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी राहते घर विकले
विनोद हे नोव्हेंबर २०२४ पर्यंत एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कामाला होते. तसेच, पिल्ले कुटुंबिय हे नेहरूनगरमध्ये स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षापूर्वी त्यांनी आर्थिक विवंचनेतून आपले राहते घर विकले. त्यानंतर ते अजमेरा कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना सुसाइड नोट, विषारी औषधाची बाटली मिळून आली. जळालेला कोळसा मिळून आला. विनोद यांनी १ जून रोजी सोडियम नायट्रेट हे विषारी औषध ऑनलाइन मागितले होते. हे औषध घातक श्रेणीत येत असून सुरक्षा व शासकीय नियमांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी अशा प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित किंवा मर्यादित असते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिली. तपासासाठी तिघांचेही मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत, असेही आव्हाड यांनी सांगितले.
