पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ४३ देशांतील ११६ चित्रपट विनामूल्य दाखविले जाणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, सायप्रस, इटली, ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, लेबनॉन, पॅलेस्टाईन, चिली, ब्राझील, जपान, थायलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस आदी देशांचा सहभाग आहे.

या महोत्सवात लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांमधून विज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रेम व मानवी भावना, महापूर व आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे विविध विषय मांडण्यात आले आहेत.

याशिवाय शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण व लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृती संवर्धन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदल जनजागृती आणि कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा सकारात्मक व समाजाभिमुख विषयांचाही समावेश असल्याचे महापौर लांडगे म्हणाले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. ४३ देशांतील ११६ दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि मानवी मूल्यांवर आधारित आशयपूर्ण कलाकृती नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नव्या विचारांना दिशा मिळेल, असा विश्वास रवी लांडगे यांनी व्यक्त केला.