पिंपरी : रस्‍त्‍याच्‍या कडेला धोकादायकरित्‍या उभ्‍या केलेल्‍या केमिकल टँकरला मुंबईच्‍या दिशेने निघालेल्‍या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्‍यू झाला. ही घटना पुणे मुंबई महामार्गावर पुनावळे येथे घडली.

मेजो एम. एम. (वय ४२, रा. मु. पो. वाटाणा तरा, पो. मन्‍नम पेठा, ता. अम्‍ब्‍लुर, जि. त्रिशुल, रा. केरळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत त्‍यांचा आतेभाऊ संतोष गोपी तोट्‌टापायी (वय ५३, रा. पोस्ट अवीनीशेरी, जि. त्रिशूर, केरळ) यांनी रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. याकूब अली दस्तगीर शेख (वय ४५, रा. बिमाईल, ता. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी याकूब शेख याने केमिकल टँकर महामार्गावर कोणतीही सुरक्षा न बाळगता उभा केला होता. त्यावर मागून मेजो यांचा ट्रक जोरदार धडकला. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीएमपीएमएल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसने धडक दिल्‍यामुळे झालेल्‍या अपघातात एका तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना वाकड येथील जगताप डेअरी पुलाखाली घडली.

अकीर हमिजुद्दीन शेख (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍याचा मामेभाऊ छंन्‍नात अली शेख (वय २८, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. किशोर महादेव मोरे (वय ४२, रा. माण डेपो फेज-२, हिंजवडी पावर हाऊस, पुणे) असे गुन्‍हा दाखल केलेल्‍या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकीर शेख हा रस्ता ओलांडत होता. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या पीएमपीएमएल बसने त्यांना जोरदार धडक दिली. डोक्यात व शरीरावर गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दुचाकीच्‍या धडकेत पादचारी जखमी

रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघाता पादचारी तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात कुरुळी गाव हद्दीत घडला. जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालका विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रस्ता ओलांडत होता. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या दुचाकीने फिर्यादी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचा डावा पाय मोडला व डोक्यास किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकी चालक जमखीला मदत न करता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पाणी घेण्यावरून तरुणास दगडाने मारहाण

पाणी घेण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणाला तीन जणांनी दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना तळेगाव येथील वारंगवाडीत घडली.

याबाबत जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाणी घेऊन परत येत होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या आरोपींनी विनाकारण फिर्यादी यांना दगडाने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

धामणे येथे गावठी पिस्तूलसह युवक अटक

गावठी पिस्तूल व एक काडतूस बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी सायंकाळी सव्‍वासहा वाजताच्‍या सुमारास ही कारवाई करण्‍यात आली. विशाल नंदू शेळके (वय ३२, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव असून पोलसांनी त्‍याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार दिलीप विश्वनाथ राठोड यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीला संशयावरून ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍यांच्‍याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण २८ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्‍त केला. शिरगाव परंदवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

तळेगाव दाभाडे येथे पिस्तूलसह तरुणास अटक

झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणाकडून एक देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई करण्‍यात आली. अविनाश अभिमान वाघमारे (वय १९, रा. भैरवनाथ शाळा रोड, धावडे वस्‍ती, भोसरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. पोलीस हवालदार संतोष शिवाजी जाधव (वय ३८) यांनी गुरुवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अविनाश याला संशयावरून ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडून ४९ हजार रुपयांचे एक बेकायदा पिस्तूल व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज हस्‍तगत केला.