पिंपरी : वाढीव पाणी उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना गेल्या सव्वासहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, सद्य:स्थितीमध्ये अपुरा, कमी दाबाने, दूषित पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भामा आसखेड धरणाचे पाणी उपलब्ध हाेत नाही, ताेपर्यंत नवीन व्यावसायिक नळजाेड न देण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. नव्याने तयार होत असलेल्या गृहनिर्माण साेसायट्यांनाही केवळ पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. वापरासाठीचे पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित विकसकावर असणार आहे.

उन्हाच्या झळा वाढताच पाण्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर पडत आहे. शहराच्या विविध भागांतून २२ दिवसांत ४७० तक्रारी अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबतच्या आल्या आहेत. पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तक्रारी वाढू शकतात. याचा विचार करून पाणीपुरवठा विभागाने भामा आसखेड धरणातील पाणी उपलब्ध हाेत नाही, ताेपर्यंत नवीन व्यावसायिक नळजाेड न देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण साेसायट्यांना केवळ पिण्यासाठी पाणी दिले जाणार आहे. सांडपाण्याची व्यवस्था संबंधित गृहनिर्माण साेसायटीच्या बांधकाम व्यावसायिकांनी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

३७ वर्षांपासून पवना धरणातून पाणीपुरवठा

शहराला ३७ वर्षांपासून केवळ मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा हाेत हाेता. शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असताना पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या मदतीने प्रयत्न केले. त्यानुसार भामा आसखेड धरणातून १६७, तर आंद्रा धरणातून शंभर असे २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा आरक्षित करण्यात आला आहे. यामधील आंद्रा धरणातून मे २०२३ पासून ९० एमएलडी पाणी शहराला मिळण्यास सुरुवात झाली. हे पाणी इंद्रायणी नदीवरील निघाेजे येथील बंधाऱ्यावरून उचलून ते चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या ठिकाणी प्रक्रिया करून भाेसरी, माेशी, चऱ्होली, जाधववाडी भागात वितरित केले जाते. मात्र, जलसंपदा विभागाकडून नदीत कमी पाणी साेडण्यात येत असल्याने इंद्रायणी नदीतील पाणी अशुद्ध असल्याच्या सातत्याने तक्रारी येतात.

भामा आसखेड प्रकल्प रखडल्याने पाणीटंचाई

भामा आसखेड धरणातून थेट जलवाहिनीने पाणी आणण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. सद्य:स्थितीत जलवाहिनीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प रखडल्याने शहरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर हाेऊ लागली आहे. मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन नवीन निविदा काढण्याचा आदेश महापाैर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पवना धरणात ५९ टक्के पाणीसाठा

शहराला मावळातील पवना धरणातून दिवसाला ५५० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. या धरणात आजमितीला ५८.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीअखेर ५७.५१ टक्के पाणीसाठा होता. यंदा १.३२ टक्के पाणीसाठा अधिक आहे. मात्र, वाढत्या उन्हाबराेबर पाण्याचे बाष्पीभवन वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन धरणाचे शाखा अभियंता रजनीश बरिया यांनी केले आहे.

शहरातील वाढत्या लाेकसंख्येला पाण्याची कमतरता भासत आहे. भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुरेसे पाणी उपलब्ध हाेणार आहे. हा प्रकल्प पूर्ण हाेईपर्यंत नवीन व्यावसायिक नळजाेड दिले जाणार नाहीत. गृहनिर्माण साेसायट्यांना केवळ पिण्यासाठी पाणी दिले जाईल. वापरासाठीच्या पाण्याची सोय संबंधित विकसकाला करावी लागणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांनी सांगितले.