पिंपरी : दुष्काळामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात १६ ऑक्टाेबरपासून लागू केलेल्या दहा टक्के कपातीमुळे अपुरा, कमी दाबाने, दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मागील १९ दिवसांत शहरातील दहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सारथी हेल्पलाइनवर २८२ तक्रारी आल्या आहेत. यामधील ६५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, २१७ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्व महापालिका आणि इतर संबंधित संस्थांनी पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करावी, अशी सूचना राज्य शासनाने केली हाेती. त्यानुसार १६ ऑक्टाेबरपासून शहरात दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. शहराला मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहरात दहा टक्के पाणी कपातीनंतर सध्य:स्थितीत पवना, आंद्रा आणि एमआयडीसीकडून ५९० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जात आहे. अतिरिक्त कपातीमुळे अपुरा, कमी दाबाने, दूषित पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ हाेऊ लागली आहे. सर्वाधिक तक्रारी ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयातून ४३, ‘फ’ मध्ये ४०, ‘ब’ मध्ये ३५, ‘ग’ मध्ये ३४, ‘ल’ मध्ये ३०, ‘ड’ मध्ये २७, ‘इ’ मध्ये २४, ‘क’ मध्ये २१, ‘अ’ मध्ये १५, सर्वांत कमी तक्रारी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये १३ तक्रारी आल्या आहेत.
पाणी वितरणाचा हिशेब द्या
शहरासाठी उचलले जाणारे पाणी आणि विविध भागांत प्रत्यक्ष वितरित झालेला पाणीसाठा याचा तपशील महापालिकेने सार्वजनिक करावा. प्रभागनिहाय पाण्याची मागणी आणि प्रत्यक्ष उपलब्धतता, टँकर पुरवठा, त्यावरील खर्च, संबंधित कंत्राटे आणि कमी दाबामागील तांत्रिक कारणे स्पष्ट करणारा अहवाल सादर करावा. पाणीटंचाई असताना नवीन बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. अशा प्रकल्पांना दिलेल्या पाणी उपलब्धतता प्रमाणपत्रांची व प्रतिज्ञापत्रांची तपासणी करावी. प्रत्यक्ष पाणी उपलब्धतेची पडताळणी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे.
पाण्याच्या तक्रारी काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचे निराकारण केले जात आहे. शहराच्या सर्वच भागातीला पाणी वितरणात कपात केली आहे. सर्वांना समान पाणी दिले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
