पिंपरी : ‘एल निनाो’च्या प्रभावामुळे अर्धा जून महिना संपूनही पावसाला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे शहरातील खासगी आणि महापालिकेचे जलतरण तलाव तत्काळ बंद करण्याचे आदेश महापाैर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिले. ‘नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय न करता पाणीबचतीचे धोरण राबवावे. त्याचबरोबर २५ जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जाताे. साेमवारअखेर पवना धरणात २० तर आंद्रा धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला मागील साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. असे असतानाच आता पाऊस लांबल्याने नागरिकांसमाेर आणखी पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.
या बाबत महापाैर रवी लांडगे यांनी साेमवारी सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला काही महत्त्वाचे आदेश दिले. महापाैर लांडगे म्हणाले, ‘एल निनाेमुळे पावसाला विलंब हाेत आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत वर्षी पवना धरणात १५ जूनपर्यंत समाधानकारक पाणीसाठा हाेता. यंदा अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही. २५ जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल. तत्पूर्वी दक्षता म्हणून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. शहरातील खासगीसह महापालिकेचे जलतरण तलाव बंद करण्यात यावेत. शहरातील खासगी वाॅशिंग सेंटरचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी पाण्याचा अपव्यय हाेत असेल तर कारवाई करावी. बांधकामांना महापालिकेतर्फे देण्यात येणारे पाणी बंद करावे, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. नागरिकांनी पाण्याची बचत करून पुढील धाेका टाळावा, असे आवाहनही
महापाैरांच्या सूचनेला नगरसेवकांची केराची टोपली
फुगेवाडीत विषारी दारू पिल्याने १७ जणांचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून करावी, अशी सूचना महापाैर रवी लांडगे यांनी केली. मात्र, दारू पिऊन मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुंटुंबीयांना आपण मदत का करावी, चुकीच्या गाेष्टींना मदत करणे याेग्य नाही. चांगल्या कामाला एक महिन्याचे काय, एका वर्षाचे मानधन देऊ, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेत महापाैरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर
भामा आसखडचे काम संथगतीने
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.
