पिंपरी : गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांवर आणखी पाणीकपातीचे संकट आहे. पवना धरणातील पाणीसाठा २२ टक्क्यांवर आला असल्याने पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणीकपात करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यावर, पावसाचा अंदाज घेऊन १५ दिवसांनी पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. शहरासह नगरपालिका, ग्रामपंचायत, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पवना धरणातून पाणी दिले जाते. महापालिका पवना धरणातून सोडलेले पाणी पवना नदीवरील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलते. दररोज ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध पाणी उपसा करून ते प्राधिकरण, निगडी येथील पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. येथे शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला जलकुंभाद्वारे पाण्याचे वितरण केले जाते.

आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधारा येथून उचलले जाते. दररोज उचलल्या जाणाऱ्या या ९० दशलक्ष लिटर पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथून जलकुंभाद्वारे समाविष्ट भागाला पाणी वितरित केले जाते. सध्या प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. धरणात आजमितीला २२.२९ टक्के पाणीसाठा आहे. धरणाचे पात्र कोरडे पडले आहे. तेथून शेतकरी गाळ काढून नेत आहेत. आंद्रा धरणातील पाणीसाठाही ३१ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आणखी पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे.

दैनंदिन उपलब्ध पाणी (एमएलडी, दशलक्ष लिटरमध्ये)

  • पवना धरण : ५५०
  • आंद्रा धरण : ९०
  • एमआयडीसी : ३०
  • एकूण : ६७०

शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तूर्तास कोणतीही वाढीव कपात केली जाणार नाही. पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपातीबाबत १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्याची सूचना केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पाणीकपातीसंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. चर्चेअंती पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल. पाऊस लांबल्यास मोठे संकट ओढावेल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले.