पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) अतिरिक्त पाच दशलक्ष लिटर (एमएलडी) वाढीव पाणी देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. ‘एमआयडीसी’ने पाच ‘एमएलडी’ पाण्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा दर अधिक असल्याने प्रस्ताव रखडला असून, शहराला वाढीव पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहराला गेल्या ३७ वर्षांपासून पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे राज्य सरकारच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येत आहे. मात्र, शहराच्या काही भागांत अपुरा, विस्कळीत, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पवना नदीवरील रावेत बंधारा येथील जलउपसा केंद्रापासून महापालिका आणि ‘एमआयडीसी’च्या स्वतंत्र जलवाहिन्या आहेत. तेथूनच एमआयडीसी शहरातील औद्योगिक, एमआयडीसी वसाहत व मोठ्या आस्थापनांना पाणी पुरवते.

‘एमआयडीसी’कडून १५० किलोमीटर परिघात आठ हजार कंपन्या, आस्थापनांना दररोज ६० ते ७० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला ३० एमएलडी पाणी दिले जाते. हे पाणी ‘एमआयडीसी’लगत असलेल्या रहिवासी भागाला वितरित केले जाते. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. अपुरा, कमी दाबाने, विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेने ‘एमआयडीसी’कडे वाढीव पाच एमएलडी पाणी मिळावे, असा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, या वाढीव पाण्यासाठी ‘एमआयडीसी’ने २० कोटी रुपयांची रक्कम मागितली आहे.

केएसबी चौकातून जोड देण्यास नकार

‘एमआयडीसी’ची केएसबी चौक ते बर्ड व्हॅली अशी जलवाहिनी आहे. या ठिकाणी उतार असल्याने या दरम्यानच पाण्याचा जोड द्यावा, अशी मागणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, तेथून जोड दिल्यास ‘एमआयडीसी’च्या अन्य आस्थापनांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य ठिकाणाहून जोड घ्यावा, असे ‘एमआयडीसी’ने कळविले आहे.

‘एमआयडीसी’कडून सद्य:स्थितीत ३० एमएलडी पाणी घेतले जाते. पाण्याची मागणी वाढल्याने वाढीव पाच एमएलडी पाणी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यापाेटी २० काेटी रुपयांची मागणी ‘एमआयडीसी’ने केली आहे. हा दर परवडणारा नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.