पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे  २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २८ एप्रिलला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून २९ एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.

निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून सहकार्य करावे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा

पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर

आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर

एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर

एकूण – ६५० दशलक्ष लीटर

भामा आसखडचे काम संथगतीने

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी  भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे.  धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.