पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार पाण्याचे नियोजन करावे. पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवावी. आता उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू देऊ नका, पाणीपुरवठा सुरळीत करा, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
महापौर लांडगे यांनी शनिवारी निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यावेळी उपस्थित होते. शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीने सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावित उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून दररोज ९० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० दशलक्ष लीटर क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्याची सूचना महापौर लांडगे यांनी केली.
निगडीतील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ दशलक्ष लीटर क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले होते. शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र ५५० दशलक्ष लीटर क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून शहरातील ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहिती महापौर लांडगे यांनी घेतली.या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.
स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क असून तो मिळवून देणे माझी जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या जातील, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

