पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पाणीचोरीचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. मीटर असलेला अधिकृत नळजोड बंद ठेवून, दुसऱ्या अनधिकृत नळजोडाद्वारे पाणी उचलले जात असल्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारे पाणी चोरणाऱ्या चिखली, माेरेवस्ती भागातील नळजोडधारकांना पाणीपुरवठा विभागाने दणका दिला आहे. असे ४२ अनधिकृत नळजोड खंडित केले असून, पुन्हा अनधिकृत नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिखली, माेरेवस्ती भागात नागरिकांनी अर्ध्या ते एक गुंठ्यात बैठी घरे बांधली आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत हाेत्या. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने परिसरात पाहणी केली.

यामध्ये काही नागरिकांकडे एक अधिकृत आणि एक अनधिकृत नळजोड असल्याचे निदर्शनास आले. अधिकृत नळजोडाचे पाणी मीटर बंद ठेवून अनधिकृत नळजोडामार्फत पाणीचाेरी केली जात होती. अनधिकृत असलेले असे ४२ नळजोड पाणीपुरवठा विभागाने खंडित केले. तसेच, यापुढे बेकायदा नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कार्यकारी अभियंता विजयसिंह भाेसले यांनी दिला.

पाणीपुरवठा विभागाचे कारवाईचे पाऊल

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीगळती ४० टक्के असून, पाणीचोरीही होते. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली असून, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडधारक, नळजोडाला मोटार पंप लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढली आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी शहरातील बेकायदा नळजोड शोधून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. पाणीचोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.