पुणे : रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हातात घेऊन रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविणे हेच अनेकांसाठी धाडसाचे काम. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अनिता गोसावी यांच्या कामाची व्याप्ती त्याहीपलीकडची. कोव्हिडच्या काळात गरजेपोटी सुरू झालेला त्यांचा रुग्णवाहिका चालविण्याचा प्रवास आजतागायत सुरू आहे. रुग्णांबरोबरच रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेहही नेण्याचे काम त्या करतात. ‘जे काम कुणी करीत नाही, ते काम करायला मला आवडते,’ असे सांगणाऱ्या अनितांचे ‘मृत्यूच्या सावलीतही माणुसकी न सोडण्याचे’ तत्त्व साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कोव्हिड काळात गरजेतून सुरू झाला प्रवास
अनिता यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. त्यांच्या आईचे भाजी विक्रीचे काम होते. त्या आईचा टेम्पो चालवून भाजी आणण्याचे काम करीत होत्या. वाहन चालविण्याचा अनुभव असल्याने कोरोनाच्या काळात भावाने त्यांना रुग्णवाहिका चालविण्याचा सल्ला दिला. त्यांचा भाऊ गेल्या २५ वर्षांपासून रुग्णवाहिका सेवेत आहे. भावाला कोरोना झाल्यावर त्याच्या रुग्णवाहिकांमध्ये चालक म्हणून काम करण्यास कोणी तयार नव्हते. अखेर अनिता यांनी भावाच्या जागी रुग्णवाहिका चालविण्याचा निर्णय घेतला.
अनिता म्हणाल्या, ‘कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून नेण्याची भीती सुरुवातीला वाटली. मात्र, आवश्यक सुरक्षा साधने वापरून त्यांनी रुग्णाला कोव्हिड केंद्रात नेले. कोव्हिडच्या काळातही अनिता यांनी १८५ मृतदेह वाहून नेले. घरी परतल्यावर कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये म्हणून त्या स्वतंत्रपणे राहणे, आंघोळ करण्याची काळजी घेत असे.’ भावाची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका चालविणे थांबवले; मात्र या कामाची आवड निर्माण झाली. भावाने दुसरी कार घेतली आणि तिचे रुग्णवाहिकेत रूपांतरित करून ती अनिता यांना दिली. त्यानंतर गेली सहा वर्षे त्यांचा हा प्रवास अखंड सुरू आहे.
मध्यरात्री रेल्वे रुळांवर मृतदेहांचा शोध
अनिता यांनी नंतर मृतदेह वाहून नेण्याचीही जबाबदारी स्वीकारली. विशेषतः रेल्वे अपघातातील मृतदेह उचलण्याचे काम त्या करतात. मृतदेह कधी रेल्वे रुळांवर एखादा किलोमीटर आत असतो. पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचतात. रात्री एक-दोन वाजता अंधाऱ्या रेल्वे रुळांवरून जाण्याचे प्रसंग अनेकदा आले आहेत. काही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असतात. तरीही भीती बाजूला ठेवून त्या पोलिसांच्या मदतीने त्या मृतदेह प्लॅटफॉर्मपर्यंत आणतात.
मृतदेहांच्या वाहतुकीपासून अंत्यसंस्कारांपर्यंत
एकदा ओळख न पटलेल्या अत्यंत कुजलेल्या मृतदेहाची वाहतूक करताना रुग्णवाहिकेत इतकी दुर्गंधी पसरली, की ती चार दिवस उघडी ठेवावी लागल्याची आठवण त्या सांगतात. अशा मृतदेहांवर पुढील प्रक्रिया होईपर्यंत त्यांना सांभाळणे, पोलिसांशी समन्वय साधणे आणि वारस न सापडल्यास अंत्यसंस्काराची व्यवस्था करणे, हेही त्यांच्या कामाचा आता भाग बनले आहे.
मृत्यूचे अनेक प्रसंग जवळून पाहूनही काम सोडायचा विचार येत नाही. उलट, इतर कोणी जे करीत नाहीत, ते काम करण्याचे आव्हान आवडते. मला या कामातून आनंद मिळतो. जे काम कोणी करीत नाही, ते मला करायला आवडते. असे अनिता संजय गोसावी अभिमानाने सांगतात.
