पिंपरी : रस्त्याने चालताना पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हच्या पाच फूट खोलीच्या पाईपमध्ये गुडघ्यापर्यंत पाय अडकलेल्या महिलेची अग्निशामक दलाने सुखरुप सुटका केली. महिलेच्या पायास कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊन पाईपच्या बाजूने रस्ता खोदून दोन तासांच्या प्रयत्नात महिलेची सुटका करण्यात आली. ही घटना काळेवाडीतील पाचपीर चौकात बुधवारी दुपारी बारा वाजता घडली.

स्मिता भागवत कासारे (वय ६५) यांची अग्निशामक दलाने सुखरुप सुटका केली. कासारे या काळेवाडीतील रस्त्याने चालत जात होत्या. पाचपीर चौकातून जाताना पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हच्या पाच फूट खोलीच्या पाईपमध्ये त्यांचा पाय अडकला. याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रातील बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त मनुष्यबळ तसेच आवश्यक यंत्रसामग्रीची मदत मागवून घेतली. पाणीपुरवठा वाहिनीवरील व्हॉल्व्ह संचलनासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २०० मिमी रुंदीच्या पाच फूट खोलीच्या पीव्हीसी पाईपमध्ये गुडघ्यापर्यंत महिलेचा पाय अडकून  मुरगळल्याचे निदर्शनास आले. 

जवानांनी पाईपच्या सभोवतालची जमीन खोदली. ग्राइंडर कटर, हायड्रॉलिक कटर, पेट्रोल इंजिन ऑपरेटेड कटर या अत्याधुनिक बचाव उपकरणांच्या साहाय्याने बचाव कार्य करण्यात आले. महिलेचा पाय पाईपमध्ये घट्ट अडकल्यामुळे त्यांना कोणतीही हालचाल करता येत नव्हती. तसेच त्या बेशुद्ध पडू नयेत, बचाव कार्यात अधिक अडचण निर्माण होऊ नये याकरिता महिला अग्निशामक जवानांनी सतत संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला. पाणी पिण्यासाठी दिले. मोकळी हवा मिळेल याची काळजी घेत त्यांना सहकार्य करण्यासाठी धीर दिला.

खोदकामादरम्यान पाणीपुरवठा वाहिनी, विद्युत केबल किंवा पीएनजी गॅस पाईपलाईन यांना कोणतीही हानी पोहोचू नये तसेच अन्य कोणताही धोका निर्माण होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणांचा वापर करताना संबंधित महिलेच्या पायास कोणतीही इजा होणार नाही यासाठी अत्यंत दक्षतेने व सावधगिरीने संपूर्ण बचाव मोहीम राबविण्यात आली. बचाव कार्य पूर्ण करण्यासाठी अग्निशामक विभागास दोन तासांचा कालावधी लागला. अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व सुरक्षितरीत्या महिलेची कोणतीही इजा न होता सुटका केली.